मनसेचे तळ्यात मळ्यात, भाजपही संभ्रमात; निवडणुकीनंतर युती होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:24 PM2021-12-09T18:24:06+5:302021-12-09T18:25:48+5:30
नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढवल्या आहेत. मात्र, २०१७ मध्ये मनसेच्या ४० वरून अवघ्या पाच जागा आल्याने ...
नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढवल्या आहेत. मात्र, २०१७ मध्ये मनसेच्या ४० वरून अवघ्या पाच जागा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. नाशिक महापालिकेत मनसेने २००७ मध्ये प्रथम निवडणूक लढवली तेव्हा १२ नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर थेट सत्ताच मिळाली असली तरी दोन्ही वेळी मनसेने स्वबळावरच निवडणुका लढवल्या होत्या. २०१७ मध्ये पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली आणि पाच नगरसेवकच निवडून आले. २०१७ मध्ये राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेवर असल्याने दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळाल्याच; परंतु भाजपाला तर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमत मिळाले. परंतु आता त्यातही राज्यातील सत्तांतर भाजपाच्या अडचणीचे कारण आहे.
पाच वर्षातील गटबाजी तसेच नवे जुने वाद आणि महत्त्वाचे राज्यातील सत्तांतर यामुळे भाजपाला मेाठे आव्हान आहे. तर मनसेची अवस्था आधीच बिकट त्यात बहुसदस्यीय प्रभाग यामुळे या पक्षालाही निवडणूक सोपी नाही. साहजिकच महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप- मनसे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे. दोन महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील नाशिक दौऱ्यावर आले आणि त्यांची भेटदेखील झाली. तेेव्हापासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा वाढल्या आहेत. मध्यंतरी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गेल्या सोमवारी (दि. ६) राज ठाकरे नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यांचे मत अजमावत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे आलेच नाहीत. त्यांच्या ऐवजी केवळ मनसे नेते संदीप देशपांडे हेच आले आणि त्यांनी युतीचा कोणताही विषय सध्या नाही. मनसे स्वबळावरच लढणार असल्याचे सांंगितले. त्यामुळे युतीचा सस्पेन्स कायम आहे.
भाजपचा फायदा नाही?
नाशिकमध्ये युती केल्यास भाजपाला मनसेकडून फार फायदा होणार नाही असे भाजप नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी ते पक्षश्रेष्ठींपर्यंत कळवले आहे. भाजपने शंभर प्लस मिशन आहे. अशावेळी मनसेला जागा सोडल्यास भाजपाचे मिशन अडचणीत येऊ शकते. याशिवाय मनसेचे विद्ममान नगरसेवक असलेल्या ठिकाणी भाजपाची तर भाजपाच्या विद्ममान नगरसेवकांच्या जागा मागितल्यातर अडचणीदेखील होऊ शकतात. त्यामुळे गोंधळ वाढू शकतो.
निवडणुकीनंतरच युती शक्य
निवडणूकपूर्व युती करून गोंधळ वाढवून घेण्याच्या ऐवजी निवडणुकीनंतर भाजप-मनसे युती शक्य आहे. २०१२ निवडणुकीत मनसेला बहुमत नसताना भाजपाने पाठबळ दिले होते. आताही निवडणुकीनंतरच गरज भासल्यास युती होऊ शकते.
भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. सध्या तरी नाशिक महापालिकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मनसेने तयारी केली आहे.
- संदीप देशपांडे, नेता मनसे