येत्या दोन महिन्यांत ६०५ सोसायट्यांच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:48 AM2022-02-03T01:48:17+5:302022-02-03T01:48:36+5:30
कोरोनाचे सावट कमी होऊन शासनाने निर्बंध शिथिल केले असताना सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या सहकार विभागाने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्या प्रसिद्धीनंतर ४५ दिवसांत निवडणूक घेण्यात येणार असल्याने एप्रिल महिन्यात या निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : कोरोनाचे सावट कमी होऊन शासनाने निर्बंध शिथिल केले असताना सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या सहकार विभागाने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्या प्रसिद्धीनंतर ४५ दिवसांत निवडणूक घेण्यात येणार असल्याने एप्रिल महिन्यात या निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली असून, गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन व निर्बंधांमुळे सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. विविध कार्यकारी सोसायट्यांचे मतदार हे बाजार समिती व जिल्हा सहकारी बँकेचे प्रतिनिधी मतदार म्हणून असतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती देऊन अगोदर विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. परिणामी बाजार समित्यांच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सहकार विभागाने विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवठका घेण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १२२१ विविध कार्यकारी सोसायट्या असून, त्यापैकी ६०५ सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या टप्पाटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात येवला, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, सटाणा, देवळा, कळवण, इगतपुरी या नऊ तालुक्यातील १०५ सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यावर हरकती, सुनावणी होऊन २५ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सोसायट्यांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ४५ दिवसांनी निवडणुका घेण्याची तरतूद असून, त्यानुसार मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या ६०५ सोसायट्यांची निवडणूक येत्या दीड ते दोन महिन्यांत घेण्यात येणार आहेत. सध्या प्रसिद्ध झालेल्या सोसायट्यांच्या प्रारूप मतदार याद्यांवर तालुक्याच्या सहनिबंधकांकडे हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
चौकट====
कोरोनामुळे सोसायट्यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती, ती आता उठविण्यात आल्याने सहकार विभागाने निवडणुकीची तयारी केली आहे. याद्या प्रसिद्धीनंतर ४५ दिवसांत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
- सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक