मतदारयादीची फोड; प्रशासनापुढे आव्हान
By admin | Published: November 5, 2016 01:49 AM2016-11-05T01:49:41+5:302016-11-05T01:57:56+5:30
प्रभागनिहाय मतदान : सदोष यादीबद्दलही तक्रारी
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा एक अवघड टप्पा पार केल्यानंतर आता प्रशासनापुढे प्रभागनिहाय मतदारयादीची फोड करण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय, सदोष मतदारयाद्यांबाबतही आतापासूनच इच्छुकांसह नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्याने त्याचीही डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिकेने प्रारूप प्रभागरचना तयार केल्यानंतर त्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत केवळ ३२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. सदर हरकतींवर येत्या सोमवारपासून सुनावणी होऊन अंतिम प्रभागरचना दि. २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रभागनिहाय मतदारयादीची फोड करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रभागांची सीमांकने निश्चित करताना मतदार यादीही नजरसमोर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्रानुसार मतदारयाद्यांची फोड करावी लागणार असून, ती सुद्धा अवघड जबाबदारी मनपा प्रशासनाला पेलावी लागणार आहे. यंदा प्रभागाची लोकसंख्या ३७ ते ५३ हजाराच्या आसपास असल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. याशिवाय, यापूर्वी एका मतदान केंद्रावर सुमारे हजार ते बाराशे मतदार होते. परंतु यंदा एका मतदान केंद्रावर ही संख्या सातशे ते आठशेवर आणावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे.
विशेषत: दोन प्रभागांतील सीमेवर असलेल्या मतदारांची फोड करण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनापुढे असणार आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचीही जबाबदारी मनपावर आहे. अंतिम प्रभागरचना घोषित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदारयादीच्या कामाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)