निवडणूक कामांचा फटका : महापालिकेच्या विविध विभागांतील कामे थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:12 AM2019-03-28T00:12:40+5:302019-03-28T00:12:58+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कामाला लावले आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कामाला लावले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाची सोय झाली असली तरी महापालिकेची अनेक कामे थंडावली आहेत. टपाल विभागातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांनादेखील या कामाला जुंपल्याने हा विभाग बंद पडला आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी ही कामे ठीक; परंतु यंदा निवडणूक शाखेने अन्य कामांनादेखील महापालिका अधिकारी आणि कर्मचांऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान आणि मतमोजणीसह विविध कामे मिळून आत्तापर्यंत दीड हजार कर्मचाºयांना विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यात पाणीपुरवठा, गटार, पथदीप, नगररचना तसेच कर वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश असून, त्यामुळे अत्यावश्यक कामात काही व्यत्यय आला तर तो निस्तारण्यासाठीदेखील अधिकारी आणि कर्मचारी नाही अशी अडचण आहे. महापालिकेचे मूलभूत काम हे सेवा देणे असून, अशावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात परस्पर कर्मचारी नियुक्त होत असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विनंती फेटाळली
नूतन जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना निवडणूक कामासाठी नियुक्त करावे याबाबत बोलणार असल्याचे सांगितले होते. तथापि, जिल्हा प्रशासनाने मात्र महापालिकेची विनंती फेटाळल्याचे दिसत आहे.