शहर बस वाहतुकीसाठी अखेर इलेक्ट्रिक बसची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:11 AM2019-08-17T01:11:08+5:302019-08-17T01:11:28+5:30

शहरात बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला निविदांचा प्रतिसाद मिळू लागला असून, शुक्रवारी (दि.१६) एका कंपनीच्या इलेक्ट्रिकल बसची चाचणी घेण्यास प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी तसेच अन्य अधिकारीदेखील यात सहभागी झाले होते.

 Electric bus test for city bus transportation | शहर बस वाहतुकीसाठी अखेर इलेक्ट्रिक बसची चाचणी

शहर बस वाहतुकीसाठी अखेर इलेक्ट्रिक बसची चाचणी

googlenewsNext

नाशिक : शहरात बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला निविदांचा प्रतिसाद मिळू लागला असून, शुक्रवारी (दि.१६) एका कंपनीच्या इलेक्ट्रिकल बसची चाचणी घेण्यास प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी तसेच अन्य अधिकारीदेखील यात सहभागी झाले होते. दोन दिवस सदरची चाचणी असून, तांत्रिक तपासणीत योग्य ठरल्यासच या कंपनीच्या आर्थिक देकारची पुढील तपासणी होणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालविण्याचा ठराव करण्यात आल्यानंतरदेखील प्रशासकीय पातळीवर बससेवेसाठी प्रतिसाद मिळत नव्हता. महापालिकेच्या वतीने दीडशे इलेक्ट्रिकच्या बस वापरण्यात येणार असून, पन्नास डिझेल, तर दोनशे सीएनजी बस असतील. यासंदर्भात निविदापूर्व बैठकीस अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहत असले तरी प्रत्यक्षात निविदा मात्र भरल्या जात नव्हत्या. इलेक्ट्रिक बससाठी तीनवेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र तिन्हीवेळेस एकाच कंपनीने निविदा भरली होती. त्यामुळे इवे या कंपनीची तांत्रिक बिड उघडण्यात आले आणि त्यात नमूद केलेल्या पात्रतेनुसार या बस आहेत किंवा नाही त्याची तपासणी करण्यात आली.
महापालिकेने बससेवेच्या तांत्रिक तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, त्यात मनपाचे लेखापाल, लेखापरीक्षक, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या समितीने शुक्रवारी बसमध्ये बसूनही क्षमता तपासली. त्याचवेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी रामायण ते सातपूर आणि तेथून राजीव गांधी भवन या मार्गावरून सफर केली.
मनपाने सीएनजी आणि डिझेलसाठी मागवलेल्या निविदांनादेखील प्रतिसाद मिळाला असून, तीन निविदा प्राप्त झाल्याने आता त्यादेखील पुढील आठवड्यात उघडल्या जाणार आहेत. त्यामुळे मनपाच्या बसची डबल बेल लवकरच वाजेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि.१७) तपासणीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आर्थिक देकार तपासला जाणार आहे. महापालिकेने प्रति किलोमीटर प्रवासी वाहतूकीचे दर मागितले असून, ते किती सादर होतात, यावर पुढील निविदेचा निर्णय होणार आहे.
दरम्यान शहर बस वाहतुकीसाठी असलेल्या इलेक्ट्रिक बसची क्षमता ३८ प्रवासी व एक चालक अशी आहे. बसमध्ये दोन बॅटरी असून, त्याचा वेग माफक असेल. परंतु शहर बस असल्याने सामान वाहण्यासाठी अतिरिक्त जागा असणार नाही. अन्य बसच्या तुलनेत बस वाहतुकीची क्षमता कमीच असेल. सध्या हैदराबाद येथे या कंपनीची बससेवा सुरू आहे.

Web Title:  Electric bus test for city bus transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.