जुन्या नाशकात विजेचा लपंडाव
By admin | Published: June 15, 2014 12:49 AM2014-06-15T00:49:16+5:302014-06-15T01:29:04+5:30
राष्ट्रवादीचे निवेदन : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
नाशिक : जुन्या नाशकातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अचानकपणे खंडित होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सानुले यांना निवेदन देण्यात आले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जुन्या नाशकातील बरीचशी घरे जुनी व कच्च्या वीट-मातीची आहेत. यातील बहुतांश घरांचे छत पत्र्याचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वीज नसल्याने पंखाही लावता येत नसून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पंख्याअभावी लहान मुलांनाही त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासा जरी पाऊस पडला तरी वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी वीज कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी नगरसेवक रंजना पवार, नाना पवार, मिलिंद रिकामे, रामा गायकवाड, भूषण शिरसाठ, धर्मराज काथवटे, सीमा सोपे, सोनी परदेशी, ओमकार बेदरकर, विकी जगताप, अमोल कुमावत आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)