हिरावाडी परिसरात विजेचा लपंडाव
By admin | Published: December 21, 2016 11:01 PM2016-12-21T23:01:06+5:302016-12-21T23:01:53+5:30
नागरिक त्रस्त : दररोज होतोय वीजपुरवठा खंडित
पंचवटी : येथील हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळ तसेच सायंकाळच्या सुमाराला दैनंदिन वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून सदर वीजपुरवठा खंडित होण्याबाबतचे कोणतेही कारण स्पष्ट केले जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कधी सकाळच्या वेळी तर कधी सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने सकाळच्या वेळी नोकरदार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होते तर सायंकाळी वीजपुरवठा काही काळ खंडित झाल्याने महिलावर्गाची अडचण निर्माण होते. वीज वितरण कंपनीमार्फत कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग सुरू केलेले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र प्रत्यक्षात हिरावाडी परिसरात दैनंदिन सकाळ व सायंकाळच्या वेळी किमान अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण गुलदस्त्यात आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीने विद्युत वाहिनी, विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यास ते तत्काळ दुरुस्त करून नागरिकांना नियमित सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)