इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:27 AM2019-04-29T00:27:35+5:302019-04-29T00:27:55+5:30
नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगर : नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, कमोदनगर, एलआयसी कॉलनी, मानस कॉलनी, देव दत्त सोसायटी, श्रीराज सोसायटीसह परिसरात दिवसातून अनेक वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवसागणिक उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच ऐन उन्हाळ्यात दिवसातून अनेक वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरात बसणे सुद्धा नागरिकांना मुश्कील झाले आहे. नागरिकांनी अनेक वेळेस महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात वादळ, पाऊस नाही तरीही परिसरातील वीजपुरवठा वारंवार का खंडित होतो? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे, मग तर पावसाळ्यात बघायलाच नको असा गलथान कारभाराबद्दल नागरिक त्रस्त झाले आहेत.