मेशी परिसरात विजेचा लपंडाव; शेतकरी हैराण
By admin | Published: September 16, 2016 10:36 PM2016-09-16T22:36:18+5:302016-09-16T22:36:30+5:30
मेशी परिसरात विजेचा लपंडाव; शेतकरी हैराण
मेशी : मेशीसह परिसरात खंडित वीजपुरवठा होत असल्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शासनाच्या नियमानुसार शेतीला आठ तास वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना, रविवारपासून अचानक सहा तास वीजपुरवठा सुरू केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मेशी गावाला धोबीघाट येथील वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा केला जातो. यात खडकतळे येथील काही रोहित्रांचा भार आल्याने वीजपुरवठा सुरळीत होत नाही. सध्या कांदा लागवड सुरू असून, खंडित वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीबाबत संताप व्यक्त होत
आहे.
मेशी गावाला नेहमीप्रमाणे किमान आठ तास सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील वर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती होती यावर्षी मागील महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मात्र एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे पिकांना विहिरीचे पाणी भरावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)