रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोंबकळतात विद्युत तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 12:45 AM2022-04-07T00:45:00+5:302022-04-07T00:45:26+5:30
इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ठरु पाहत आहे.
इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ठरु पाहत आहे.
इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. तालुक्यातील नागरिक येथे उपचारासाठी, लसीकरण करण्यासाठी येत असतात. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच विद्युत वाहिनींच्या जीर्ण झालेल्या तारा एकमेकांत गुंतलेल्या असून, काही तारा लोंबकळत आहेत. जमिनीपासून ६ ते ७ फूट अंतरावर या तारा आल्या आहेत. त्यांच्या खालीच पिण्याच्या पाण्याचा स्टीलचा वॉटर फिल्टर असून, बाजूला औषधांचा कक्ष आहे. समोरच रुग्ण तपासणी व विविध प्रकारच्या तपासण्या करण्याची लॅब आहे. या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल? असा प्रश्न केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून याठिकाणी नवीन तारा बसवून त्यांची कन्सिल्ड फिटिंग करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघतोय की काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन तत्काळ नवीन वायरिंगचे काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर नवीन वायरिंगचे कन्सिल्ड फिटिंग केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. याला संबंधित विभाग जबाबदार राहील, कारण आम्ही रुग्णांच्या जीवाशी कोणताही खेळ होऊ देणार नाही.
- सुमित बोधक, शहराध्यक्ष, मनसे.