नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:36 AM2018-08-21T00:36:01+5:302018-08-21T00:37:22+5:30
महापालिकेच्या वतीने पर्यावरणास चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक अमरधाममध्ये विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने पर्यावरणास चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक अमरधाममध्ये विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे. मात्र ती कार्यान्वित असूनही कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पंचवटी अमरधाममध्ये सध्या नादुरुस्त असलेली डिझेल शवदाहिनी पंचवटी अमरधाममध्ये स्थलांतरित करण्यात येत असून, तेथे डिझेल ऐवजी गॅसवर ती चालविण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे अकरा स्मशानभूमी असून नाशिक व पंचवटी अमरधाम सर्वांत मोठे आहे. त्या खालोखाल देवळाली अमरधामवर ताण असतो. नाशिक अमरधाममध्ये सुमारे दहा वर्षांपूर्वी डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी लागणारा लाकूड फाटा वाचावा व यानिमित्ताने वृक्षतोड टळावी हा त्यानिमित्ताने उद्देश असला तरी लोकांमध्ये सुरुवातीला प्रबोधन नव्हते. नंतर मात्र प्रतिसाद वाढला. सध्या महिन्या काठी सुमारे वीस ते पंचवीस अंत्यसंस्कार डिझेल दाहिनीत केले जातात. त्यातील पंधरापेक्षा अधिक बेवारस मृतदेह असतात. अर्थात, ही डिझेल दाहिनी नादुरुस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यातच ठाणे येथील एकमेव ठेकेदार तो दुरुस्त करीत असतो. गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर त्या अंतर्गत नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मध्यंतरी स्मार्ट सिटी कंपनीनेदेखील प्रत्यक्ष पाहणी केली होती.
नाशिक अमरधाममध्ये त्यानुसार विशेष शेड बांधून विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे. मात्र ती अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही दुसरीकडे नादुरुस्त डिझेल दाहिनी आता पंचवटी अमरधाममध्ये पाठवून ती गॅसवर कार्यान्वित करण्यात येणार आहे.