१७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 06:30 PM2018-02-24T18:30:38+5:302018-02-24T18:30:38+5:30
वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी
नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षापासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.
या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत विज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरूस्त करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले,त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिका-यांनी गणवेष परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधितांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ५२५ शेतकरी वीज ग्राहकांनी वीज पुरवठा सुरूळीत होत नसल्याबद्दल तक्रार केली असुनही अद्यापही वीज कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तात्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले,त्याच बरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेवून पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली याचा अहवालही ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.