भरणा केंद्र बंद असल्याने वीजबिले थकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:56 PM2020-05-17T21:56:56+5:302020-05-18T00:12:00+5:30
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
महावितरणच्या आॅनलाइन बिले भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला गेला तर बिले रीपिट आली. मीटर नोंद न करता बिले भरणे योग्य नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कळवण तालुका आदिवासीबहुल असून, आॅनलाइन बिले भरण्याबाबत जनता अनभिज्ञ आहे. महावितरण अॅप असो किंवा अन्य आॅनलाइन सुविधा गोरगरीब व आदिवासी जनतेला याबाबत अपेक्षित ज्ञान नाही व ते हाताळताही येत नाही. कळवण शहरातील धनलक्ष्मी पतसंस्था व कळवण मर्चंट बँकेत सर्व प्रकारचे वीजबिल अधिकृत भरणा केंद्र सुरू असताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरणा केंदे्र तात्पुरती बंद केली आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांकडून वीजबिलांचा भरणा झालेला नाही.
आॅनलाइन भरणा करताना उपलब्ध साधनांअभावी ग्राहकांना बिले भरता आली नाहीत. दर महिन्याला मीटर रिडिंग घेत बिले येत असतात. ती बिले शेकडो ग्राहक या दोन्ही संस्थांमध्ये भरण्यासाठी जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून महावितरण कंपनीने ही दोन्ही केंद्रे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवली आहेत. यामुळे कळवण तालुक्यातील बिल भरणा मोठ्या प्रमाणात ठप्प असून, आॅनलाइन बिल भरणा करण्याबाबत ग्रामीण भागातील अज्ञानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मिटल्यानंतर एकदम तीन ते चार महिन्यांची बिले भरणार तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील ग्राहकांना पडला आहे.
कळवण शहरातील महावितरण बिल भरणा केंदे्र पुन्हा सुरू करण्यात यावे व सुरक्षित अंतर व अन्य काळजी घेण्याच्या नियम व अटी यांची पूर्तता या संस्थांकडून करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत
आहे.
कोरोनाची साथ सुरू असताना बँक व पतसंस्थांची अन्य कामे सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत सुरू आहे. अन्य सेवा बंद नसताना बील भरणा केंद्रे बंद करून शासनाने
ग्रामीण व आदिवासी जनतेवर अन्यायाची भूमिका घेतली आहे, अशी भावना ग्राहकांची झाली आहे.
कळवण तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनेक व्यापारी दुकाने खुली करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सुविधा समजून लवकरात लवकर वीजबिल भरणा केंद्रं सुरू करण्यात यावीत, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.महावितरण कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात संस्थेतील अधिकृत बिल भरणा केंद्र बंद केले आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी शासनाचे सर्व नियम-निकष पाळून पतसंस्थेत भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याची आमची तयारी आहे.
- दीपक महाजन, कळवण
बिल भरणा केंद्र बंद असल्यामुळे बिले थकत आहेत. मीटर रिडिंग न घेता बिले भरावीत कशी व कुठे, हा प्रश्न आहे. आदिवासी व ग्रामीण जनतेला मोबाइल अॅप व अन्य आॅनलाइन सेवेचा वापर करताना अडचणी येतात. भरणा केंद्र पुन्हा सुरू करावीत.
- प्रभाकर गावित, ग्राहक, कळवण