इंदिरानगर परिसरात वीज देयकास विलंब
By Admin | Published: August 21, 2016 01:39 AM2016-08-21T01:39:10+5:302016-08-21T01:39:28+5:30
भुर्दंड : ग्राहकांची महावितरणविरोधात तक्रार
इंदिरानगर : परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात येणारे वीजदेयके मिळत नसल्याने ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी
केली आहे. वीजदेयक वेळेवर देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
महावितरण कंपनीच्या वतीने दर महिन्यास वीजमीटरचे छायाचित्राद्वारे वाचन करण्यात येते. तसेच दर महिन्यास वीज देयक देण्यात येते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून वीजदेयक वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. इंदिरानगर,
कमोदनगर, राजीवनगर, सार्थकनगर, समर्थनगर, सराफनगर, चेतनानगर, राणेनगर, रामनगरसह परिसरात दिवसागणिक सोसायटी व अपार्टमेंट वाढतच आहेत. त्याचबरोबर वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासर्व ग्राहकांना दर महिन्यास वीजदेयक भरण्याच्या अंतिम तारखेच्या एक किंवा दोन दिवस आधी मिळते. त्यामुळे वीज देयक भरण्यासाठी वीजदेयके केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बहुतेक ग्राहकांना वीजदेयके भरता येत नाही. त्यामुळे त्यांना दंडाची रक्कम भरावी लागत आहे. त्यातून आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा अनियमीत होत आहे. (वार्ताहर)