शेतात काम करणाऱ्या कुटुंबीयांवर वीज कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:33 PM2021-05-29T22:33:43+5:302021-05-29T23:58:26+5:30
सिन्नर : उसाच्या शेतात खत टाकत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला गेलेल्या लांडगे कुटुंबीयांवर वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर : उसाच्या शेतात खत टाकत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला गेलेल्या लांडगे कुटुंबीयांवर वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
प्रियंका भागवत लांडगे (२४) व तिचे काका (मावशीचे पती) बाळासाहेब राहाणे (५०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत एक जण गंभीर असून, त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. एका युवकावर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमी बहीण-भावाला उपचार करून दवाखान्यातून सोडून देण्यात आले. सायाळे-मीरगाव रस्त्यावरील लांडगे वस्तीवर ही घटना घडली.
सायाळे-मीरगाव रस्त्यावर लांडगे वस्ती आहे. भागवत जगन्नाथ लांडगे (५२, रा. सायाळे) व त्यांचे साडू बाळासाहेब राहाणे (५०, मूळ रा. चंदनापुरी, ता. संगमनेर हल्ली रा. सायाळे) हे कुटुंबीयांसमवेत उसाच्या शेतात खत टाकण्याचे काम करीत होते. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. लांडगे व राहाणे कुटुंबीयांनी शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज झाडावर कोसळली.
घटनेची माहिती समजताच शेजारी राहणारे रामदास लांडगे यांनी धाव घेत मदतीसाठी ग्रामस्थांना फोन करून बोलावून घेतले. विजय लांडगे, सोमनाथ लांडगे, निवृत्ती लांडगे, रामदास लांडगे, हौशीराम लांडगे यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्व जखमींना तीन खासगी वाहनातून सिन्नरला हलविले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी प्रियंका भागवत लांडगे (२४) व तिचे काका बाळासाहेब राहाणे (५०) या दोघांना मृत घोषित केले. तर प्रियंकाचे वडील भागवत जगन्नाथ लांडगे (५२) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. तर प्रियंकाचा मावसभाऊ शुभम बाळासाहेब राहणे (२४) याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आश्विनी भागवत लांडगे (२०) व प्रतीक भागवत लांडगे (१८) हे बहीण-भाऊ किरकोळ जखमी असल्याने त्यांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले. लांडगे कुटुंबीयांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्यासह कर्मचारी पंचनामा करण्यासाठी सायाळे येथे रवाना झाले होते. वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
इंजिनिअर प्रियंका आली होती घरी
भागवत लांडगे यांची मोठी मुलगी प्रियंका हिचे बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण झाले आहे. प्रियंका पुण्याला एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला होती. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने प्रियंकाचे वर्क फ्रॉर्म होम सुरू होते. त्यामुळे प्रियंका गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याहून सायाळे येथे घरी आली होती. खेड्यात राहणाऱ्या शेतकरी आईवडिलांनी प्रियंकाला शिकवले होते. प्रियंकाच्या अचानक दुर्दैवी मृत्यूने सायाळेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.