वाहनाच्या धडकेने वीजतारा तुटल्या नागडे गाववासीय अद्याप अंधारात
By admin | Published: May 18, 2014 07:56 PM2014-05-18T19:56:48+5:302014-05-18T23:52:03+5:30
येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर येवला-कोटमगाव रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम चालू आहे. यामुळे औरंगाबादकडून येणारी वाहतूक नागडे गावामार्गे वळविण्यात आली आहे. वाहनाच्या धडकेमुळे नागडे-कोटमगाव रस्त्यादरम्यान इलेक्ट्रिकचा पोल आणि विजेच्या तारादेखील तुटल्या आहेत. यामुळे या परिसरातील शेतकर्यांची वीज खंडित झाली आहे.
येथील ग्रामस्थ हरिश्चंद्र काळे, लक्ष्मण साताळकर, अशोक थोरात, देवीदास साताळकर यांच्यासह १५ शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीला या संबंधाने वारंवार तोंडी वीजजोडणी पूर्ववत करण्याची मागणी केली. अखेर लेखी निवेदनाद्वारे रास्ता रोकोचाही इशारा दिला आहे.
शेतकर्यांनी वीजदेयके भरल्याशिवाय डी.पी.च्या कामासह वीजजोडणी पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनी येत नाही. आता तर वाहनाच्या धडकेने विजेच्या तारा व पोल तुटला आहे. तरीही तत्पर वीजजोडणी पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी पुढाकार घेत नाही. गेल्या महिनाभरापासून या परिसरात चार डी.पी. बंद आहेत. शेतकरी मदतीला तयार असतात तरीही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अनास्था का दाखवतात असा सवाल या परिसरातील विजेअभावी त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी केला आहे.
उड्डाणपुलामुळे नागडेमार्गे मोठी वाहतूक औरंगाबादकडून ये-जा करीत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुतर्फा कमालीचा वाहतुकीचा ताण पडत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळा सुरू होण्याअगोदर साइडपीचे काम करून त्यावर भराव घालावा. आवश्यक तेथे रस्ता रुंद करावा, अन्यथा रस्ता खचला तर वाहतुकीत मोठा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बावळण रस्त्यावरील प्रमुख तार वळणांवरचा रस्तादेखील रुंद करण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी एकदम अरुंद असलेल्या या रस्त्यावरून दोन्ही वाहने, समोरासमोर आल्यानंतर मार्ग काढणेदेखील अवघड होते.