वीजदरवाढ, बिलांविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:06 AM2020-07-04T00:06:40+5:302020-07-04T00:48:15+5:30
वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली.
नाशिक : वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली. आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणीदेखील करण्यात आली.
राज्य शासनाच्या महावितरण विभागाने एप्रिलपासून वीज बिलांमध्ये अचानकपणे केलेली दरवाढ आणि नागरिकांना अवाजवी बिलांचे वितरण करीत सामान्य नागरिकांना विजेचा धक्काच दिल्याच्या निषेधार्थ महानगरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. एप्रिलपासून वाढवण्यात आलेले वीज बिलांची दरवाढ मागे घेण्यात यावी. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यासह ३०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ करण्यात यावी, अशी मागणीदेखील निवेदनाद्वारे करण्यात आली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये संपूर्ण राज्यातील विद्युत वितरण कंपन्यांसाठी ९० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे. त्यातील तीन हजार कोटी रुपये राज्य शासनाच्या वितरण कंपन्यांकडे जमा झाले आहेत, त्यामुळे अवाजवी दरवाढ आणि भरमसाट बिले त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनप्रसंगी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू, शिवाजी गांगुर्डे, सुरेश पाटील, योगेश हिरे, देवदत्त जोशी, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, स्वाती भामरे, अनिल जाधव, विलास देवळे, धनंजय पुरोहित, दिनेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.