मुकणेचे काम झाल्याने विजेची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:06 AM2019-05-16T01:06:27+5:302019-05-16T01:06:52+5:30
मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
नाशिक : मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी बुधवारी (दि.१५) मुकणे धरणाची पाहणी केली आणि जून महिन्याच्या आत धरणाच्या शिरोभागाचे काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना ऐन उन्हाळ्यात सुरू झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. २६६ कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत महापालिकेने १६ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनने पाणी विल्होळी नाक्यावर आणले आहे. याठिकाणी महापालिकेने उंचावर जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. तेथून पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुत्वाकर्षामुळे उंचावरून सखल भागाला पाणीपुरवठा होत असल्याने जलकुंभांवरून पाण्याचा उपसा करून अन्य भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी बुस्टर पंपाचा उपयोग करण्याची गरज नाही. तसेच गंगापूर धरणाच्या ठिकाणाहून कमी पाणी उपसा झाला की त्यामुळेही विजेची बचत होणार आहे. त्यासाठी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून पाण्याचा वापर वाढण्याची गरज आहे. सध्या १ मेपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सुरुवातीला सात ते आठ दशलक्ष लिटर्स पाण्याचे वितरण करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने मुकणे धरणाचे पाणी हे केवळ पाथर्डी परिसरच नव्हे तर अगदी सिडकोतदेखील दिले जात आहे. त्यामुळे लवकरच अनेक भागातील जलवितरणाचे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.