तीन दिवसांपासून इंदिरानगरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:26 AM2019-06-12T00:26:24+5:302019-06-12T00:27:26+5:30
पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रारीलाही वाव नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगर : पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रारीलाही वाव नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पहिल्याच पावसामुळे इंदिरानगर, राजीवनगर, कमोदनगर, सार्थकनगर, कानिफनाथनगर, शास्त्रीनगर, वडाळागाव यांसह परिसरात काही भागांत दहा तास तर काही भागांत सुमारे २४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नुकत्याच पडलेल्या पावसामुळे उकाडा वाढलेला असताना त्यात वीज खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
सोमवारी सायंकाळीदेखील परिसराने अनुभवला. सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात होताच, तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत सर्वत्र
काळोख पसरला. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांच्या वीज उपकरणांचे नुकसान
झाले.
या संदर्भात तक्रारीसाठी वीज कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणीच उपलब्ध होऊ शकले नाही. विजेच्या या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून, वीज कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.