निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित
By admin | Published: December 27, 2015 11:20 PM2015-12-27T23:20:06+5:302015-12-27T23:23:15+5:30
निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित
निकवेल : बागलाण पश्चिम पट्ट्यातील निकवेलसह परिसरातील दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा ह्या गावांमध्ये तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे रविवारी २७ रोजी डांगसौदाणे विद्युतपुरवठा कार्यालयावर शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांना घेराव घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. संबधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
निकवेलसह परिसरात दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा आदि गावांना विद्युतपुरवठा कंपनीचे डांगसौंदाणा येथुन विद्युतपुरवठा होत असतो; मात्र डांगसौदाणे सबस्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत जवळ जवळ ४८ तास वीजपुरवठा खंडित आहे. या कालावधीमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत झाला का नाही याची खात्री करण्यासाठी १ ते २ तास वीजपुरवठा देण्यात आला; त्यानंतर परत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजपुरवठा सुरळीत नसल्याने लागवड झालेल्या कांद्याला पाणी मिळाले नसल्याने कांदा लागवडही वाया जाणार आहे. काल सकाळी ११ वाजता निकवेल येथील शेतकऱ्यांनी थेट विद्युत वितरण कंपनीचे डांगसौंदाणा येथील कार्यालयामध्ये जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी निकवेल परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा नाही. सध्या कांदा लागवड सुरू आहे. लागवड झाल्यावर पाणी लागते, मात्र पाण्याला वीजपुरवठाच नाही तर पाणी शेतीला कसे देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी कार्यालयाचे उपयंत्रचालक एस. के. आहिरे यांनी शेतकऱ्यांना समजूतदारपणे सांगण्यात आले की, आम्ही मान्य करतो की, गेल्या शुक्रवारपासून तुमच्या गावाचा विद्युतपुरवठा बंद आहे. आज ४ वाजेपर्यंत तुमच्या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.त्यानंतर डांगसौदाणा येथील तुळजाभवानी एज्युकेशनचे चेअरमन संजय सोनवणे यांनी तहसीलदार पोतदार यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सध्या निकवेल परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र गेल्या तीन दिवसंपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. विद्युतपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, भिका वाघ, नीलेश वाघ, रमेश वाघ, अभि महाजन, कृष्णा वाघ, गोकुळ वाघ, केवल सोनवणे, नाताजी वाघ, चिंतामण वाघ आदि शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)