नाशिकच्या गौळाणे शिवारातील कारखान्यात २४ लाखांची वीजचोरी
By संदीप भालेराव | Published: September 10, 2022 07:14 PM2022-09-10T19:14:29+5:302022-09-10T19:15:21+5:30
या ठिकाणी प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर हे आहेत.
नाशिक : नाशिक तालुक्यातील गौळाणे शिवारातील एका प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सुमारे २४ लाख रूपयांची वीज चोरीचा प्रकार उघडीस आला. वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली जात असल्याचे नााशिकच्या भरारी पथकाने उघडकीस आणले. गौळाणे गावाच्या शिवारात चुंबळे फार्म जवळ असलेल्या प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या या कारखान्याला डी. आर. जोशी या नावाने थ्री फेज वीजजोडणी देण्यात आलेली आहे.
या ठिकाणी प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर हे आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या प्लास्टिकचे दाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले असून एकूण १ लाख ५९ हजार १५ विद्युत युनिटची म्हणजे एकूण २४ लाख ५३ हजार ५६० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखाना चालविणारे अरबाज सलीम शेख व दिलीप दातीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, सहाय्यक अभियंता ए.जी. चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली.