दोन जिल्ह्यातील वीज सीमावाद संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:47 PM2019-12-08T22:47:50+5:302019-12-08T22:49:29+5:30
नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या न्यायडोंगरीचा वीजपुरवठा रविवारी (दि. ८) सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी जळगावकडून नाशिक विभागाकडे वीजपुरवठा हस्तांतरित झाल्याने रात्रंदिवस धावपळ करीत असलेल्या वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात ही बाब आणून देत, हा सीमावाद कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी केली. त्यास कार्यकारी अभियंता डोंगरे व सहायक अभियंता वाटपाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींची पूर्तता करून दिल्याने नाशिक विभागातील पिंपरखेड, ता. नांदगाव येथून न्यायडोंगरी उपकेंद्रासाठी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
न्यायडोंगरी, बिरोळा, हिंगणेदेहरे, पिंप्रीहवेली, परधाडी, पिंपरखेड, चिंचविहीर, चांदोरा, जळगाव खुर्द या गावांना या बदलाचा फायदा होणार आहे.न्यायडोंगरी वीज उपकेंद्रास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून वीजपुरवठा केला जात असे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असे. परंतु वीज वितरणासाठी जळगाव विभाग येत असल्यामुळे नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिकडे जाऊन काम करू शकत नव्हते. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन आर्कि. अश्विनी आहेर यांनी हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.