प्राथमिक शिक्षकांना निवृत्तिवेतन मिळण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:19 PM2020-03-11T23:19:26+5:302020-03-11T23:21:34+5:30
देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
देवळा तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे देना बँकेत खाते आहे. पंचायत समितीचे अनुदानाचे खाते हे स्टेट बँकेत आहे. निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतनाचे अनुदान पंचायत समितीच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर या अनुदानाचा धनादेश स्टेट बँकेत जमा केला जातो. मात्र स्टेट बँकेतून सवडीने सर्वच्या सर्व रक्कम ही देना बँकेकडे वर्ग केली जाते. देना बँकेचे कर्मचारी निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लावतात. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांना दीड ते दोन महिना उशिरा मिळते. सर्वच सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध आहेत. पेन्शन जमा झाली किंवा नाही याची विचारणा करण्यासाठी त्यांना बँकेचे अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच वयोमानाप्रमाणे येणारे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी औषधोपचाराचा मोठा खर्च त्यांना पेन्शनमधून करावा लागतो. बँकांच्या दिरंगाईमुळे औषधांसाठी वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने हात उसनवारी करावी लागते.
या सर्वातून मार्ग काढण्यासाठी बँकांनी आॅनलाइन पद्धतीने आरटीजीएसद्वारे शिक्षकांचे पेन्शन त्यांच्या खात्यात वर्ग करून वेळेचा अपव्यय टाळावा व लवकरात लवकर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्तिवेतन अदा करावे अन्यथा निवृत्तिवेतनधारकांसह बँकेच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे किसन निकम, बी.टी. आहिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला आहे. तहसीलदार शेजूळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सोमनाथ मुसळे, भाऊराव अहिरे, जिभाऊ गुंजाळ, नंदकुमार खरोटे, बाळकृष्ण चव्हाण, नारायण रणधीर, निंबा आहेर, सुलोचना थोरात, धर्माजी पाटील यांच्यासह निवृत्तिवेतनधारक उपस्थित होते.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या बैठकीत तालुक्यातील पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याची तक्र ार करण्यात आली होती. पंचायत समितीकडून होणारी दिरंगाई व बँकेकडून होणारी अडवणूक तसेच त्यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो.
- निंबाजी आहेर, सेवानिवृत शिक्षक, देवळापंचायत समितीचे गटविकास अधिकारी, देना बँकेचे व स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून योग्य उपायोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पेन्शन दिरंगाईस कारणीभूत असलेल्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करून निवृत्तिवेतन वेळेवर दिले जाईल.
- दत्तात्रय शेजूळ, तहसीलदार, देवळा