हत्तीचे बळ आणि वाघाची चाल...
By Admin | Published: September 9, 2016 02:15 AM2016-09-09T02:15:27+5:302016-09-09T02:20:07+5:30
बैठक : कार्यक्षमतेवर शंका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना चुचकारले
श्याम बागुल नाशिक
‘असे म्हणतात, प्रशासन हा हत्ती आहे, तो आपल्या चालीने चालतो. पण हत्तीची कार्यक्षमताही तेवढीच असते. हत्ती जेव्हा मनात आणतो तेव्हा तो जेवढे वजन पेलू शकतो तेवढे वजन कोणीच पेलू शकत नाही. म्हणून आता यापुढे चाल वाघाची आणि ताकद हत्तीची जर प्रशासनाने आणली तर आपण हे परिवर्तन करू शकतो’ अशी आशादायक साद घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी शासकीय यंत्रणेला अकार्यक्षमतेबद्दल आडवे हात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना चुचकारले.
शासकीय योजनांचा खुद्द मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बसून आढावा घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्यापासून धाकधुकीत असलेली प्रशासन यंत्रणा जस-जशी बैठकीची घटिका समीप आली, त्या प्रमाणात धास्तावली. प्रत्यक्ष गुरुवारच्या बैठकीला सुरुवात होताच ज्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामेच सुरू झालेली नाहीत त्या तालुक्याच्या कृषी अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यालाच मुख्यमंत्र्यांनी जाब विचारल्यामुळे या बैठकीचे गांभीर्य आणखीच गडद झाले. गावनिहाय व कामनिहाय आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी प्रारंभापासूनच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण बैठकीचा नूर बदलून जलयुक्त शिवार असो वा अन्य योजनांच्या अंमलबजावणीत यंत्रणेने जे काही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कामे केली त्याचे कौतुक होऊ शकले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांची बैठक निव्वळ झाडाझडतीसाठीच होती, असे चित्र निर्माण झाले.
प्रशासन व्यवस्थेला मंदगतीने झुलणाऱ्या हत्तीची उपमा देतानाच, त्याच्यातील कार्यक्षमतेलाही हत्ती एवढे बळ असल्याचे सांगून चुचकारले. बदली- बढतीचा गोंधळ व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वाघाची चाल चालण्याचा सल्ला दिला. अर्थात एकीकडे हे करीत असताना विभागातील पालकमंत्र्यांनी यापुढे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा सातत्याने आढावा घेण्याच्या सूचना करून शासकीय यंत्रणा हाताबाहेर जाणार नाही याची तजवीजही करून ठेवली. थोडक्यात, गुरुवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची जशी जवळून मानसिकता चाचपडण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रकारे अधिकाऱ्यांनीही सरकारची प्राथमिकता नेमकी काय हे ओळखून घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांशिवाय सरकार काहीच करू शकत नाही हे हेरून असलेल्या मुख्यमंत्र्यांना सरते शेवटी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची घोषणाही करावी लागली, यातच सारे काही आले.