महिला अधिकाऱ्यावर अकरा खात्यांचे ओझे
By admin | Published: November 18, 2016 12:18 AM2016-11-18T00:18:39+5:302016-11-18T00:17:36+5:30
महापालिका : निवृत्तीला आलेल्या अधीक्षिकेची व्यथा
नाशिक : महापालिकेत ३५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्तीचा काळ पाच महिन्यांवर येऊन ठेपला असताना एका महिला अधीक्षिकेला पदोन्नती तर दूरच पण खांद्यावर आणखी अकरा खात्यांचे ओझे टाकण्याचा प्रकार प्रशासनाकडून घडला आहे. काम सहायक आयुक्त दर्जाचे पण वाहन-फोन आदि सुविधा पुरविण्यास नकार दिल्याचा अजब कारभारही समोर आला आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा कार्यभार सांभाळणाऱ्या अधीक्षिका मालिनी शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली. महापालिकेने महिला अधिकाऱ्याबाबत प्रशासनाकडून होणाऱ्या छळवणुकीचेही उदाहरण त्यानिमित्ताने समोर आले आहे. मालिनी शिरसाठ या महापालिकेत अधीक्षक या पदावर कार्यरत असून, ३० एप्रिल २०१७ रोजी त्या सेवानिवृत्त होणार आहेत. शिरसाठ यांच्याकडे नाशिक पश्चिमचा विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार होता. त्यांची नियुक्ती आता महिला व बालकल्याण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
शिरसाठ या गेल्या काही वर्षांपासून पदोन्नतीसाठी अर्ज-विनंत्या करत आहेत. परंतु प्रशासनाकडून वेळोवेळी नाना कारणे देऊन पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असल्याचे शिरसाठ यांनी म्हटले आहे. महापालिकेने शिरसाठ यांना पदोन्नती तर दूरच, परंतु त्यांच्याकडे विविध कर, कामगार कल्याण, मु.नि.क.स., महिला बालकल्याण, नाट्यगृहे व स्मारके, जनसंपर्क, सुरक्षा, टपाल, अंगणवाडी, तक्रार निवारण, क्रीडा यांसारख्या संवेदनशील खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठांकडे विनंत्या करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)