अकरा हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:42 AM2021-01-07T01:42:04+5:302021-01-07T01:43:38+5:30
नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १६२७ इतकी असून, सर्वाधिक २३८ उमेदवार सिन्नर तालुक्यातून बिनविरोध निवडून आले आहेत.
गेल्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारी झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र समोर आले होते; परंतु नांदगाव आणि येवला तालुक्यांमधील अर्ज माघारीचे नाट्य लांबल्यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील अंतिम आकडेवारी समोर आलेली नव्हती. निवडणुका असलेल्या १३ तालुक्यांमधील ५८९५ जागांसाठीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, ११,१०५ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी १६,५६३ असे इतके नामनिर्देशन अर्ज वैध ठरल्याने अर्ज माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. माघारीच्या दिवशी प्रत्येक तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज माघारीची मुदत असल्याने उमेदवारांना धावपळ करावी लागली. शंभरावर उमेदवार बिनविरोध
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर व्यापक हालचाली सुरू असल्यामुळे त्याचा परिणामही दिसून आला. अनेक तालुक्यांमध्ये शंभरच्या पुढे जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांमधून अर्ज माघार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अर्ज माघारी घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही दिसून आले.