अकरा आदिवासी गावे श्रमदानातून झाली पाणीटंचाई मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:29 AM2018-12-24T00:29:22+5:302018-12-24T00:30:04+5:30
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली.
नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली. तसेच लोकसहभागातून जलकुंभांची उभारणी केली. व्हॉट्सअॅपसारख्या समाज- माध्यमांचा वापर करून प्रमोद गायकवाड यांनी सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज हे अभियान सुरू केले आणि त्या अंतर्गत सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था स्थापन करून सोशल मीडियावरील महाराष्ट्रातील तरु णांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरित करायला सुरु वात केली. याबाबत आवाहन फेसबुकवर करताच राज्यभरातून सोशल नेटवर्कर्सचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यानंतर अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना फेसबुकवर मांडून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आणि तरु णांच्या सहभागातून उपक्र म साकारले गेले.
ग्रामविकासाची कास धरून शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात या अभियानाद्वारे हजारो वंचितांच्या जीवनात प्रकाश पडला असला तरी या सर्व उपक्र मांत खेड्यांना पाण्यासाठी समृद्ध करणे हे सोशल नेटवर्किंग फोरमचे सर्वांत लक्षवेधी काम आहे. २०१५ साली महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली. संकट कितीही मोठे असले तरी शक्य ती मदत करायचीच या फोरमच्या ध्येयानुसार बीड जिल्ह्यातील राज पिंपरी हे गाव आणि एरंडवन येथील हरिण अभयारण्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्यात आली. गावोगाव डोक्यावर हंडे घेऊन महिलांचे जत्थे रानोमाळ फिरताना दिसू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर गावोगावच्या पाणी समस्येचे गांभीर्य सोशल नेटवर्कर्सला अवगत करून देण्यात आले.
कामाचा अनुभव असणाऱ्या प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. जयदीप निकम, रामदास शिंदे, गुलाब आहेर, संदीप बत्तासे अशा तज्ज्ञांची टीम तयार झाली. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, जीवन सोनवणे, डॉ. आप्पासाहेब पवार हे मार्गदर्शक; राजेश बक्षी, लक्ष्मीकांत पोवनीकर, योगेश कासट असे अनेक अनिवासी भारतीय दाते म्हणून लाभले. या टीमने काही गावांची पाहणी केली. यासाठी आराखडा तयार केला.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल, सुरगाणा या आदिवासी पट्ट्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असूनही डोंगराळ भागातून पाणी वाहून जाते. त्यामुळे या संस्थेने गेल्या तीन वर्षांत त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या तालुक्यांमधील गढीपाडा, माळेगाव, वडपाडा आदींसह अकरा गावे, वाड्या, पाडे येथे सर्वांच्या सहकार्यातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.
श्रमदानातून खोदल्या विहिरी
पाणी आणण्यासाठी महिलांना तसेच पुरुषांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. त्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. तसेच समाज माध्यम यांच्या सहकार्याने आर्थिक मदत मिळवून लोकसहभागातून आणि गावकºयांच्या श्रमदानातून नाशिक जिल्ह्यातील अकरा गावे टँकरमुक्त केली आहेत. यासाठी जलशास्त्रज्ञांच्या मदतीने या गावांच्या परिसरात पाण्याची शक्यता तपासली. नदीकाठच्या गावांना पाणी टिकू शकेल, त्या जागेचा शोध घेऊन गावकºयांच्या श्रमदानातून विहिरी खोदण्यात आल्या. त्यानंतर पाणी लागल्याने पंपाच्या साह्याने लिफ्ट करून या गावातील टाकीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.