अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:51 PM2019-12-22T22:51:34+5:302019-12-23T00:22:48+5:30

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Eleven village water supply schemes halt | अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावात असलेले पाणी.

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिक वेठीला : जिल्हा परिषदेकडून निधी वर्ग होत नसल्याने विद्युत जलपंप दुरुस्ती रखडल्याचे कारण

सिन्नर : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाणीपुरवठा समिती, पंचायत समिती प्रशासन व योजनेत समाविष्ट ग्रामपंचायती हे सर्व एकमेकांवर जबाबदारी ढकलून देण्यात धन्यता मानत असून, नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. नादुरुस्त विद्युत जलपंप दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. योजनेत वावी, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, सायाळे, मीरगाव, कहांडळवाडी, दुशिंगपूर, शहा, मिठसागरे व मलढोण या गावांचा समावेश आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून एवढा निधी उपलब्ध होत नसल्याने योजना बंद आहे.
वावीसह अकरा गावांसाठी गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात तलाव करून मजिप्राने पाणीयोजना राबविली आहे. सदर पाणीयोजना या दुष्काळी गावांसाठी वरदान ठरली आहे, मात्र थकीत वीजबिल, पाणीपट्टी वसुली, जलशुद्धीकरण केंद्राचा मेंटेनन्स व साहित्य खरेदी, वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, गळती अशा अनेक कारणांमुळे योजनेला नेहमी ग्रहण लागलेले असते. गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात असलेला ४० हॉर्सपॉवरचा विद्युत जलपंप जळाला आहे.
तलावात भरपूर पाणी असूनही वावीच्या संतुलित जलकुंभापर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने योजनेतील समाविष्ट गावांना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावात पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आपला हिश्श्याचा निधी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काचा निधीतून वर्ग केल्याचे सांगितले जात आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग न झाल्याने समितीच्या खात्यावर निधीचा खडखडाट आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीला पैसे नसल्याने योजना बंद आहे. पाणी असूनही नळांना पाणी येत नसल्याने योजनेत समाविष्ट गावांतील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतींना मिळणारा मुद्रांक शुल्कचा निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यांवर वर्ग करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. ग्रामपंचायतींच्या खात्यावरून सदर निधी कटिंग करण्यात आला आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यास उशीर झाला आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर सदर निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात आपण सर्वच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या समितींचा आढावा घेणार आहे.
- डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नर

पाणीयोजना चांगली आहे, पण पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी सक्षम नाही. समितीची दोन वर्षांची मुदत संपली आहे. समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याची गरज आहे. वसुलीचे कारण सांगून योजनेत समाविष्ट गावांना वेठीस धरण्यात येते. योजनेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा. या आधी पदरमोड करून स्वत: खिशातून पैसे घालून योजना सुरळीत चालविली जात होती. आता कोणाकडून तरी अनामत घेऊन निधी येण्याची अधिक वाट न पाहता विद्युत जलपंप तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जनतेला वेठीस धरू नये.
- विजय काटे, उपसरपंच वावी व माजी अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती.

‘समितीकडे निधी शिल्लक नाही. गेल्या वर्षापासून वसुली होत नाही. उधारीत साहित्य खरेदी चालू आहे. मुद्रांक शुल्कचे पैसे पंचायत समितीकडून पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होणार होते, मात्र अद्याप ते वर्ग झाले नाही. ग्रामपंचायतींकडे वसुलीला गेल्यानंतर मुद्रांक शुल्क निधीचे पैसे पंचायत समितीकडून कपात करून घेतले असल्याचे सांगून आपल्याकडे थकबाकी नसल्याचे कारण सांगितले जाते. वसुलीचा चकरा मारून उपयोग होत नाही. पंचायत समितीत चकरा मारण्यात आल्या, पण अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. निधी नसल्याने विद्युत जलपंप दुुरस्ती करता येत नाही.
- किरण घेगडमल, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती.

Web Title: Eleven village water supply schemes halt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.