बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अकरावीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:16+5:302021-09-15T04:19:16+5:30
नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीतील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, त्यानंतर ...
नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीतील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, त्यानंतर तत्काळ विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांत जवळपास बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू होऊनही उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत शहरातील महाविद्यालयांना अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटल्याचे दिसून येत आहे.
नाशिक शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी जिल्हाभरातील विविध भागात विद्यार्थी नाशिकमध्ये येत असतात. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे या विद्यार्थ्यांमध्ये घट झाली असून, शहरातील ६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार ३८० जागा उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ २४ हजार ४३१ विद्यार्थ्यांनीच अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्येही रिक्त जागांच्या तुलनेत पात्र ठरलेल्यांपैकी निम्म्याच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप झाले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार ७ हजार ७५२ विद्यार्थी पात्र असले, तरी प्रवर्गनिहाय रिक्त जागा आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमामुळे २,६२९ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्यालयांचे जागा वाटप करण्यात आले आहे. यातील केवळ ६६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, अजूनही जवळपास १३ हजार ३३० जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
- -
आतापर्यंतची प्रवेश प्रक्रिया
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,३८०
एकूण अर्ज - २४,४३१
अर्जांची पडताळणी - २२,०४६
पर्याय निवडले - २०,२७४
प्रवेश निश्चित -१२,०३०
रिक्त जागा - १३,३३०