अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन सोमवारपासून सुरू
By admin | Published: June 15, 2015 01:51 AM2015-06-15T01:51:28+5:302015-06-15T01:53:54+5:30
अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन
नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन सोमवारपासून सुरू होणार असून, दुपारी ३ वाजेनंतर महाविद्यालयांमध्ये तसेच आॅनलाइन पद्धतीने प्रवेशअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजेनंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून दहावीचे मूळ
गुणपत्रक मिळणार आहे. दरम्यान, यंदा नाशिक जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के लागल्याने विज्ञान शाखेसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी प्रवेशाचा वेळापत्रक जाहीर केल्यानुसार सोमवार (दि. १५) ते गुरुवार (दि. १८) तारखेपर्यंत महाविद्यालयांमध्ये अर्ज विक्री आणि स्वीकृती केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांनी अर्ज विक्रीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. शाखा निहाय अर्ज तसेच मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था असून, अर्ज घेतेवेळी गोंधळ होऊ नये तसेच इतर बाह्य व्यक्तींचा उपद्रव होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त काही महाविद्यालयांंनी मागविला असल्याचे समजते.
नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे महाविद्यालयांमधून ७१ हजार इतकी प्रवेश क्षमता असून, दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ हजार इतकी आहे, तर शहरातील ५३ महाविद्यालयांमध्ये २० हजार इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामध्ये विज्ञानच्या ८०२० जागा आहेत. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी कसरत होणार असल्याचे चित्र आहे. पॉलिटेक्निक , आयटीआय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही टक्केच विद्यार्थ्यांनंतरही अकरावी प्रवेशाचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषत: विज्ञान शाखेसाठी चढाओढ असल्याने विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेचाच आग्रह धरू नये यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची व्यवस्थादेखील महाविद्यालयांनी केलेली आहे. तीन हजारांपेक्षा अधिक जागांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असली तरी गुणवत्ता यादीच्या अखेरच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जाणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. जिल्ह्यात कला शाखेच्या ३४,२४०, वाणिज्य शाखेच्या १३,१६०, तर विज्ञान शाखेच्या २१,९६० इतक्या जागा आहेत. (प्रतिनिधी)