जाचक अटींविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:43 PM2018-08-18T23:43:40+5:302018-08-19T00:15:25+5:30
सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्यात आला. पुणे, मुंबईप्रमाणे नाशिकलाही न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळ अशी पुनर्रचना करण्यात आली.
नाशिक : सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्यात आला. पुणे, मुंबईप्रमाणे नाशिकलाही न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळ अशी पुनर्रचना करण्यात आली.
महापालिका, पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत घालण्यात आलेले निर्बंध, जाचक अटींबाबात चर्चा करण्यासाठी तसेच जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने सर्व गणेश मंडळांची बैठक समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर गजानन शेलार, शंकर बर्वे, निवृत्ती अरिंगळे, पद्माकर पाटील, अरुण काळे, सुरेश पाटील, लक्ष्मण धोत्रे, बबलू परदेशी, बबलू शेलार, पोपट नागपुरे, हेमंत जगताप, देवांग जानी, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका थोडक्यात मांंडली.
‘कायदा सुव्यवस्था’ शब्दाखाली संस्कृतीला सुरुंग
भाजपा सरकारने महाराष्टÑाच्या धार्मिक संस्कृतीला कायदासुव्यस्था या गोंडस शब्दाखाली सुरुंग लावता कामा नये, असा सूर बैठकीत उमटला. शासन व प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत घालून दिलेले नियम शिथिल करावे, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यास सर्व मंडळांचे कार्यकर्ते नक्कीच साथ देतील, अशी ग्वाही बैठकीच्या व्यासपीठावरून देण्यात आली.
‘भालेकर’वरील बंदी हटवा
भालेकर मैदानावर केवळ वाहनतळाचे विकासकाम सुरू आहे. कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी या मैदानात सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधींची वाहने उभी होती. त्यामुळे आहे त्या स्थितीत भालेकर मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास महापालिकेला कुठलीही अडचण येता कामा नये. या मैदानावर गणेशोत्सवाला घातलेली बंदी त्वरित हटवावी, अशी मागणी यावेळी मंडळाच्या संतप्त पदाधिकाºयांनी केली.
सण-उत्सवामागे ‘शुक्लकाष्ट’
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घातले गेलेले जाचक नियम, अटींचे ‘शुक्लकाष्ट’ तातडीने प्रशासनाने संपवावे. कोणत्याही मंडळाकडून कुठल्याहीप्रकारे नियम, कायद्याचा भंग केला जात नाही. महाराष्टÑाची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक मंडळामध्ये मूळ रहिवाशांचा समावेश आहे. पाहुण्यांनी स्थानिक नागरिकांना सण-उत्सव साजरे करण्यापासून रोखू नये, अशा तीव्र भावना यावेळी मंडळांच्या पदाधिकाºयांमधून उमटल्या.