ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 01:33 AM2021-06-18T01:33:31+5:302021-06-18T01:33:59+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी, यासह विविध न्याय्य मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालावे. ओबीसींच्या मागण्यांबाबत सुरू केलेली ही रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे दिलीप खैरे यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना अटक करण्यात येऊन काहीवेळाने त्त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनात बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, समाधान जेजूरकर, संतोष गायकवाड, समीना मेमन, लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
घोषणांनी परिसर दणाणला
ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींचे पक्के आहे, ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तडा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा... अशा घाेषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.