कोरोनाच्या काळात ८० टक्के धान्याचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:49+5:302021-07-14T04:17:49+5:30
नाशिक: कोरोनाच्या संकट काळात व्यवसाय आणि रोजगार गेल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या घरात निदान धान्य पाेहोचावे ...
नाशिक: कोरोनाच्या संकट काळात व्यवसाय आणि रोजगार गेल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या घरात निदान धान्य पाेहोचावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत धान्य योजनेतच मोठा गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली असून कोरोनाच्या काळातच धान्य अपहाराचे ८० टक्के प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणी २६ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर नऊ रेशन दुकानदारांना अटक करण्याची वेळ आली. गेल्या तीन वर्षातील चौकशीत कोरोना काळात गैरव्यवहार झाल्याच्या बाबी उघडकीत आल्या आहेत.
नाशिककरांना गेल्या दीड वर्षात काेरोना संसंर्गाचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार आणि व्यवसायाला फटका बसल्याने अनेकाच्या आयुष्यात मोठी आर्थिक पोकळी निर्माण झाली. अशा कुटुंबीयांना मोफत धान्य देण्याची योजना केंद्राकडून राबविण्यात आली. गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी तसेच मागील वर्षीही कार्डधारकांना गहू आणि तांदळाचा मोफत पुरवठा करण्यात आला. त्यामुळे अनेकांना दोन घास मिळू शकले. परंतु याच दरम्यान रेशन दुकानदारांकडून मोफत धान्याचा अपहार होत असल्याच्या तक्रारींमध्येदेखील वाढ झाली. विशेषत: कोरोनाच्या काळात आलेल्या मोफत धान्य वाटपातच गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली असता गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले.
मागील तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी केली असता त्यामध्ये ८० टक्के अपहार हा लॉकडाऊन काळात झाल्याचा गंभीर निष्कर्ष काढण्यात आला. मागील तीन वर्षात पुरवठा विभागाने २६ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले तर नऊ रेशन दुकानदारांना अपहारप्रकरणी अटक केली आहे. रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. धान्य पुरवठा करताना देण्यात येणारे धान्य, थम वापरण्यातील गैरप्रकार तसेच सायंकाळनंतरही धान्य वाटप झाल्याचे पॉझ मशीनवर उमटल्याने गैरप्रकाराला पुष्टी मिळाली.
गैरप्रकाराच्या मागील तीन वर्षात ११० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तर पुरवठा विभागाने ८ हजार १८८ दुकानांची तपासणी केली असता ८३३ दुकानात किरकोळ त्रुटी आढळले. ५१ दुकानांच्या धान्य वाटपात गंभीर दोष आढळून आले आहेत. पुरवठा विभागाने या आधारे २० दुकानदारांना निलंबित केले आहे तर ४४ दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. गैरव्यहार प्रकरणी २६ दुकानदारांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. नऊ दुकानदारांना अटक तर १ लाख ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
धान्य वितरणाची वेळ दुपारी १२ वाजेपर्यंत असतानाही दुपारनंतर वाटप झालेले धान्य, सायंकाळी बंद शटर आडून सुरू असलेले व्यवहार आणि दुकानदारालाच पॉझ मशीनवरील अंगठा ग्राह्य असल्याने घेण्यात आलेला गैरफायदा या साऱ्या संशयास्पद हालचालींवरून रेशन दुकानदारांची चौकशी होऊन कारवाई करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षातील ही कारवाई असली तरी काेरोनाच्या काळात मोफत धान्यातच अधिक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
--कोट--रेशनदुकानदारांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येऊन पुरवठा निरीक्षकांमार्फत दुकानदारांची चौकशी करण्यात आली. या तपासणीत अनियमितता आढळल्यामुळे नियमानुसार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळातील गैरप्रकार अधिक आढळून आले.
- अरविंद नरसीकर, पुरवठा अधिकारी.
--इन्फो--
मागील तीन वर्षातील कारवाई
११०: पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त
८,१८८ : दुकानांची तपासणी
२६ : रेशन दुकानदारांवर गुन्हे
०९: रेशन दुकानदारांना अपहारप्रकरणी अटक
२० : दुकानदार निलंबित