पाणी नियोजनाच्या नावाखाली उधळपट्टी
By admin | Published: March 2, 2016 12:21 AM2016-03-02T00:21:37+5:302016-03-02T00:23:25+5:30
माजी महापौरांचा आरोप : पाणीपट्टी वाढीस विरोध
नाशिक : सन २०११ मध्ये गंगापूर धरणात फेबु्रवारीअखेर २१ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी पाणीकपातीची गरज भासली नाही. आता ३४ टक्के पाणीसाठा असताना पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली ११ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला जातो आहे, असा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला असून, पूर्ण सुविधा दिली जात नसताना पाणीपट्टीत २० टक्के वाढ कशासाठी, असा सवालही उपस्थित केला आहे.
सध्या महापालिकेकडून सुरू असलेली पाणीकपात आणि पाणीपट्टीत दरवाढीची स्थायीने केलेली शिफारस याबाबत पत्रकार परिषदेत दशरथ पाटील यांनी परखड मते मांडली. पाटील यांनी धरणातील सन २००१ पासूनची पाणीसाठ्याची आकडेवारी समोर ठेवत अनेक प्रश्न उपस्थित केले. पाटील यांनी सांगितले, गंगापूर धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्यास नाशिककरांवर लादलेली पाणीकपात दूर होऊ शकेल. परंतु पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली ११ कोटी रुपये खर्चाचा डाव आखला गेला आहे. सध्या शहरात ५० टक्क्यांहून अधिक पाणीकपात सुरू असल्याचा दावाही पाटील यांनी केला. नाशिककरांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, महापालिकेने वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. आयुक्तांकडून परिस्थितीचे नीट अवलोकन केले जात नाही आणि त्यासाठी त्यांच्याकडे वेळही नाही. शहरात पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही आणि स्थायी समिती प्रशासनाच्या तालावर नाचत पाणीपट्टीत २० टक्के दरवाढ करण्यास मंजुरी देत आहे. सदर पाणीपट्टी महासभेने फेटाळून लावावी. अगोदर पूर्ण सेवा द्या, मगच करवाढीचा अधिकार महापालिकेला पोहोचतो. महापालिकेने आठ दिवसांत पाणीकपात मागे न घेतल्यास अपूर्ण सेवेबद्दल न्यायालयात जाण्याचा इशाराही पाटील यांनी दिला.