आशेवाडी ग्रामसेवकाकडून ३७ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:05+5:302021-05-16T04:14:05+5:30
दिंडोरी : आशेवाडी ग्रामपंचायतमध्ये आमच्या खोट्या सह्या करत विकासकामांचा ३७ लाखांचा शासकीय निधी परस्पर मित्रांच्या खाती ग्रामसेवक दिलीप ...
दिंडोरी : आशेवाडी ग्रामपंचायतमध्ये आमच्या खोट्या सह्या करत विकासकामांचा ३७ लाखांचा शासकीय निधी परस्पर मित्रांच्या खाती ग्रामसेवक दिलीप मोहिते यांनी वर्ग करत अपहार केल्याचा आरोप सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके यांनी केला आहे. हा प्रकार आमच्या लक्षात येताच आम्ही गटविकास अधिकारी दिंडोरी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर फरार ग्रामसेवक व त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे, अशी माहिती सरपंच जिजाबाई तांदळे व उपसरपंच सुनीता बोडके यांनी दिली. आशेवाडी येथील शासकीय निधी अपहार प्रकरणी ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकाराबाबत सरपंच व उपसरपंच यांनी आपली बाजू मांडत आपल्या खोट्या सह्या करीत ग्रामसेवकाने अपहार केल्याचे सांगत सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामसेवक मोहिते यांनी माळे दुमाला येथे दोन वर्षांपूर्वी सरपंच यांची फसवणूक करून चौदाव्या वित्त आयोग निधीतून १४ लाख रुपये हडप केले आहेत. देहरे येथे ही रक्कम हडप केली आहे, मात्र तात्कालिक गटविकास अधिकारी यांनी त्यांची पाठराखण केल्याचा आरोप केला आहे.
--------------------
सदर ग्रामसेवक हे आशेवाडी येथे ११ फेब्रुवारीपासून कार्यरत असून, आम्ही त्यांना येथे हजर करून घेण्यास विरोध केला होता. मात्र पंचायत समितीने त्यांना हजर करून घेण्यास भाग पाडले. दोन महिन्याच्या कालावधीत कोणतीही विकासकामे मंजूर नसताना आणि सुरू नसताना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या बँक ऑफ बडोदा ढकांबे शाखेतून रु. ८,८८,८२० तसेच १५व्या वित्त आयोग निधीस युनियन बँक दिंडोरी शाखेतून रु. १९,२०,३८० सरपंच यांची बनावट सही करीत तसेच पेसा निधीतून रु. ९,२०,८८९ पेसा सदस्य तथा उपसरपंच व सरपंच यांच्या चेकवर बनावट सह्या करून ग्रामसेवक यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांच्या खात्यावर आर्टीजीएस व चेकद्वारे जमा करत हडप केल्याचे सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.