कालिदास कलामंदिराच्या देखभालीसाठी तातडीने ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:18 AM2019-01-11T01:18:04+5:302019-01-11T01:18:20+5:30
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे.
नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरात अनेक समस्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षे याबाबत नाशिक नव्हे तर बाहेरील कलावंतांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण केले आहे. परंतु त्यानंतरही वीज आणि ध्वनी व्यवस्थेसह अनेक समस्या आहेत. गेल्या महिन्यात एका नाटकाच्या दरम्यान वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नाट्यकलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा असेच प्रकार घडत आहे. गेल्यावेळी प्रशासनाने विजेच्या पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे कारण दिले होते, परंतु तेच प्रकार पुन्हा घडत असल्याने आयुक्त गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, वीज तसेच अन्य कामांच्या देखभाल, दुरुस्तीसह तातडीने निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.