बससेवेसंदर्भात आज तातडीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:55 PM2020-01-27T23:55:12+5:302020-01-28T00:21:54+5:30
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.
नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर १९९६-९७ मध्ये केवळ बससेवा सुरू करण्याची तयारी केली होती. ती त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील वादामुळे रद्द झाली असली तरी त्यानंतर आजपर्यंत तब्बल सहा वेळा नाकारण्यात आलेली बससेवा गेल्या भाजप-शिवसेना सरकारने महापालिकेच्या गळ्यात मारली. महापालिकेत आणि राज्यात याच पक्षाची सत्ता असल्याने हा विषय किरकोळ विरोध वगळता मंजूर झाला. त्यानंतर महापालिकेने बससेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ अशी कंपनी स्थापन केली असून बससेवा चालविण्यास देण्यासाठी निविदा मागवल्या त्यानुसार आलेल्या कंपनीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रत्यक्ष बससेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बससेवेबाबत प्रश्न निर्माण केले. गेल्या आठवड्यात यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी महापालिकेने तोट्यातील ही सेवा सुरू करण्यास भुजबळ यांनी विरोध केला तर ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झाले असून आता ही सेवा सुरू न झाल्यास ठेकेदाराला ८० टक्के भरपाई द्यावी लागेल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तर पालकमंत्र्यांनी यावर महापालिकेने आर्थिक श्वेतपत्रिका काढावी, अशी सूचना केली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. सद्य स्थिती गटनेत्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊनच कामकाज करण्यात येणार आहे.
महापालिकेने बससेवेची तयारी केली असून काही राजकीय पक्षांचा तात्त्विक विरोध आहे. तथापि, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विरोध करून उपयोग झाला नव्हता. आता भुजबळ म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच विरोध केल्याने याबाबत काय निर्णय होतो, याकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.