झाडाझडती होताच महापालिकेची आज तातडीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:27+5:302021-03-13T04:27:27+5:30
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही. यासंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, शनिवारी (दि.१३) सकाळी तातडीने बैठक बेालावली असून, आता शहरात सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे संकेत मिळाले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक बोलावली असून, त्यास सर्व खातेप्रमुखांनी हजर राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्य सचिवांनी विभागीय स्तरावर दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक घेताना नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर दिसत नाही. तसेच काॅन्ट्रॅक्ट टेसिंग अपेक्षेनुसार होत नाही. प्रतिबंधित क्षेत्रदेखील मर्यादित आहेत, या सर्व विषयांना मुख्य सचिवांनी हात घातला असल्याने त्याच विषयावर आयुक्त कैलास जाधव खातेप्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
शहरात ६ एप्रिल राेजी कोराेनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीला नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती. नंतर मात्र मुंबई, पुण्यासह बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे संसर्गही वाढत गेला. जूननंतर नाशिकमध्ये तर कोरोनाचा कहर झाला होता. परंतु नोव्हेंबरनंतर रुग्णसंख्या कमी झाली तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील घटले. त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली असून, दिवसाला पाचशेपेक्षा अधिक रुग्ण तर केवळ नाशिक शहरातच आढळत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा नियंत्रण आणले जात असले तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे.
इन्फो..
शहरातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना एका बाधिताशी संबंधित किमान तीस जणांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, प्रतिबंधित क्षेत्रांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत शनिवारी (दि.१३) होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.