गणेश मंडळांच्या भावनांचा उद्रेक ; गणेशोत्सवात निषेधाचे फलक लावण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:23 AM2018-09-04T01:23:32+5:302018-09-04T01:23:57+5:30
णेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे.
नाशिक : गणेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे. यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.३) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी नियमावलीशिवाय शहरात एक इंच जमीन देता येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचे पदाधिकाºयांचे म्हणणे असून, त्यामुळे संतप्त मंडळ कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून गणेशोत्सवात निषेधाचे फलक लावण्याचा निर्णय तातडीच्या बैठकीनंतर जाहीर केला. विशेष म्हणजे यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी बैठक सुरू असतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांना दूरध्वनी केला. मात्र त्यांनीदेखील हतबलता व्यक्त केली असून त्यामुळे आंदोलने होणारच, अशी भूमिका त्यांनी तसेच राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी घेतली. महापालिकेच्या विविध विभागात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे. मात्र महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे रस्त्याच्या एकूण रुंदीच्या तुलनेत एक चतुर्थांश जागेतच परवानगी देण्याचा दंडक घातल्याने मोठ्या मंडळांची अडचण झाली आहे. विशेषत: मध्य नाशकात यासंदर्भात मोठी अडचण झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत तसेच नाशिक आणि पंचवटी गावठाणमध्ये तर मंडपच बांधणे शक्य होणार नसल्याने मंडळांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.३) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. मंडप उभारणी परवानगीबाबत महापालिकेच्या जाचक नियमावली शिथिल कराव्यात, मंडपासाठी बांधकाम विभागाच्या ना हरकत दाखल्याची अट वगळावी आणि जाहिरात कर नसावेत, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटी असल्याचे सांगितले आणि मात्र त्यांनी नियम शिथिल करण्यास नकार दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी नियमात राहून मंडप उभारणी शक्य नसल्याने गुन्हे दाखल करा, असे सांगितले मात्र आयुक्तांनी ते मान्य केले नाही, असे गजानन शेलार यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रामसिंग बावरी, पद्माकर देशपांडे, देवांग जानी, बबलूसिंग परदेशी यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश होता. या प्रकारानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांत असंतोषाचा उद्रेक झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे आणि राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी सांगितले. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनाही महामंडळाच्या पदाधिकाºयांनी निवेदन दिले.