Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’

By अझहर शेख | Published: January 2, 2022 01:14 PM2022-01-02T13:14:23+5:302022-01-02T13:19:09+5:30

मुलगा भावनाविवश : ‘त्या’ आजीच्या पार्थिवाचे दीपक पाण्डेय यांनी घेतले अंत्यदर्शन

Emotional Story nashik boy lost her mother police commissioner met them personally got emotional | Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’

Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’

Next

अझहर शेख
नाशिक : ‘ ए आई उठ ना गं... सर आले तुला बघायला, बघ....’ अशा शब्दांत विजय पुराणे याने भावनाविवश होऊन दारावर आलेले पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सातपूरच्या शिवाजीनगर भागात असलेल्या कोळीवाड्यात राहणाऱ्या जिजाबाई रामदास पुराणे (६५) यांची प्रकृती बिघडल्याने काही दिवसापूर्वीच पाण्डेय यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करत भेट घेतली होती. शुक्रवारी रात्री त्यांचे दुर्दैवी निधन झाले. निधनाची बातमी समजताच पाण्डेय यांनी कोळीवाडा गाठून त्यांचा मुलगा विजयची भेट घेत सांत्वन केले.

महात्मानगर परिसरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचे शासकीय निवासस्थान आहे. याच भागात मागील काही महिन्यापासून जिजाबाई रस्त्यालगत फुलविक्रीचा लहानसा व्यवसाय करत होत्या. पाण्डेय हे त्यांच्याकडून दररोज पुजाविधीकरिता फुले घेत असे. त्यामुळे जिजाबाई व पाण्डेय यांचे चांगले ऋणानुबंध जुळले. दोघांमध्ये भावनिक नाते तयार झाले. जिजाबाई यांची प्रकृती मागील महिन्यात बिघडल्याने त्यांनी फुलविक्री करणे थांबविले. त्यांचा मुलगा हा त्या ठिकाणी येत फुलविक्री करत होता. यावेळी पाण्डेय यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांना जिजाबाई यांच्या प्रकृतीविषयी समजले. वेळ न दवडता त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून कोळीवाडा गाठत जिजाबाईंच्या घरी अर्धा-एक तास थांबून आस्थेने तब्येतीची विचारपूस केली. आर्थिक खर्चाची काळजी करू नका असा आधार देत कुटुंबीयांशीही संवाद साधला होता.

दुर्दैवाने जिजाबाई यांची प्राणज्योत शुक्रवारी रात्री मालवली. शनिवारी सकाळी पाण्डेय यांनी पुष्पचक्र घेत त्यांचे घर गाठले. त्यांच्या मुलाला धीर देत सांत्वन करत ‘कुठलीही मदत लागल्यास सातपूरचे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्याकडे निरोप द्यायचा’ असे सांगितले. जिजाबाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंत्यदर्शन घेत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. हा क्षण बघून कोळीवाड्यातील सर्वच रहिवाशांना गहिवरुन आले.

‘खाकी’आड दडलेला असतो माणूस
एका सर्वसामान्य गोरगरीब फुलविक्रेत्या महिलेच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्तांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ असावी. दीपक पाण्डेय यांना दारावर बघून समस्त कोळीवाडा परिसरातील तसेच सातपूर भागातील नागरिकांनाही त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आला. खाकी वर्दीच्या आतमध्येदेखील एक माणूस दडलेला असतो, याची जाणीव यावेळी येथील नागरिकांना झाली.

Web Title: Emotional Story nashik boy lost her mother police commissioner met them personally got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.