‘नाशिक मध्य’मध्ये सर्वच मतदान केंद्रांवर जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:22 AM2019-04-30T01:22:28+5:302019-04-30T01:23:05+5:30
अनेक बडे नेते, आमदार-खासदारांचे वास्तव्य असलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात दिवसभरात प्रचंंड उत्साहात मतदान झाले
नाशिक : अनेक बडे नेते, आमदार-खासदारांचे वास्तव्य असलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात दिवसभरात प्रचंंड उत्साहात मतदान झाले आणि सकाळपासूनच रांगा होत्या. जुने नाशिक गावठाण परिसरात किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले असले तरी अपेक्षेप्रमाणेच सायंकाळी मतदान संपण्याच्या वेळी बी. डी. भालेकर शाळेत एकच गर्दी झाली आणि त्यामुळे वेळ संपल्यानंतरदेखील साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
नाशिक मध्य मतदारसंघातील पश्चिम प्रभागात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मराठा हायस्कूल, उदोजी मराठा, व्ही. एन. नाईक, बॉइज टाउन, बीवायके, रचना विद्यालय अशा वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर सोमवारी (दि. २९) सकाळपासूनच मतदानाची गर्दी होती. ऊन वाढण्याच्या आत भल्या सकाळीच मतदान व्हावे यासाठी अनेक जण, तर जॉगिंग ट्रॅकवरूनच थेट मतदान केंद्रात आले होते. तरीही सकाळी रांगा दिसत होत्या. वाघ गुरुजी शाळेत सकाळी अर्धा ते पाऊण तास मतदानयंत्र बिघडल्याने झालेल्या व्यत्ययाव्यतिरिक्तमतदान सुरळीत पार पडले.
जुन्या नाशिक म्हणजे गावठाण भागातदेखील सकाळपासून गर्दी होती. नॅशनल उर्दू हायस्कूल, डॉ. सुमंत नाईक शाळा, रंगारवाडा शाळा या भागात सकाळी ९ वाजेपासून महिलांनी गर्दी केली होती. सामान्यत: या भागातील मतदार केंद्रात महिला दुपारनंतर महिला येतात, परंतु यंदा सकाळीच महिलांनी मतदान उरकून घेतले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पखालरोडवरील सावित्रीबाई फुले या मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांना पक्षचिन्ह असलेल्या स्लिपा देण्याचे प्रकार काही कार्यकर्त्यांकडे सुरू होते. त्याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.