कोरोनाबाबतचे गैरसमज दुर करण्यावर भर: डॉ. हेमंत सोननीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:47 PM2020-03-14T23:47:23+5:302020-03-14T23:50:48+5:30
नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.
नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. डॉ. हेमंत सोननीस यांची नुकतीच आयएमएच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली असून १ एप्रिलपासून ते पदभार स्विकारतील. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली बारा वर्षे ते कार्यरत आहेत. नव्या जबाबदारी संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न- सध्या राज्यात कोरोनाचे आव्हान असताना अध्यक्षपद मिळाले आहे काय वाटते ?
डॉ. सोननीस: सध्या कोरोनाचे मोठे आव्हान आहे. राज्यात आणि देशात अनेक उद्योग, व्यवसाय, मॉल्स, शाळा महाविद्यालये बंद ठेवून संसर्ग टाळला जात असताना वैद्यकिय व्यवसायिक मात्र जोखीम पत्करून सेवा देत आहेत. हे विशेष आहे. सध्या रोगराईमुळे अनेक प्रकारच्या चर्चा पसरल्या आहेत. या आजाराविषयी वैद्यकिय व्यवसायिकांना नेमकी माहिती मिळावी यासाठी लवकरच एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नागरीकांमधील गैरसमज दुर करावे यासाठी देखील पोस्टर बॅनर तयार केले जात आहेत. त्यातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रश्न: अलिकडे सार्वजनिक स्वच्छता हा विषय नागरीकांकडून दुर्लक्षीत आहे असे वाटते का?
डॉ. सोननीस : कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी जाण्याची पध्दती आहे. परंतु आजार होऊ नये यासाठी नागरीकांनीच काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कचरा अथवा कुठे थुंकणे हे देखील आजारांना निमंत्रण देऊ शकते त्यामुळे आधी सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. अर्थातच कोणी अशाप्रकारे अस्वच्छता होणार नाही याची काळजी स्वत:पासूनच घेतली पाहिजे. घरापासून सुरवात केली तर समाजापर्यंत त्याची व्यापकता वाढेल.
प्रश्न: आयएमएचे अध्यक्ष म्हणून प्राधान्य कशाला राहील?
डॉ. सोननीस : कोरोनासंदर्भात सध्या प्राधान्याने वैद्यकिय व्यवसायिकांची कार्यशाळा घेतली जाईल. त्यानंतर अन्य प्रश्नांकडे लक्ष पुरवले जाईल. शासकिय- निमशासकिय संस्थांचे नियम अत्यंत जटील असून त्यामुळे वैद्यकिय व्यवासयिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यातून शासकिय यंत्रणांच्या समन्वयाने मार्ग काढण्यावर भर असेल. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील संबंध सामंजस्याचे असावेत आणि डॉक्टरांवरील हल्ले टळावेत या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.
मुलाखत- संजय पाठक