उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठींवर भर
By Admin | Published: August 20, 2016 12:52 AM2016-08-20T00:52:45+5:302016-08-20T02:00:16+5:30
जेलरोड : महापालिका प्रभाग ३५, ३६ पोटनिवडणुकीत शह-प्रतिशह
नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत उमेदवार व पक्षाकडून मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे. मात्र पक्ष व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने एकमेकांना शह-प्रतिशह देण्यासाठी ‘भाई’ची मदत घेतली जात आहे.
जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा, मनसे व कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही प्रभागांत शिवसेना, भाजपा, मनसे आमने-सामने आहेत, तर प्रभाग ३५ मधून राष्ट्रवादी व प्रभाग ३६ मधून पिपल्स रिपाइं कॉँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. दोन्ही प्रभागांत चौरंगी लढत होत असून, उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर जोर दिला आहे. मनसेचादेखील तसाच प्रचार चालला असला तरी सध्या नाशिकरोडमध्ये एकमेव राहिलेले नगरसेवक व काही पदाधिकारी प्रचारात दिसत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाची आघाडी असली तरी ती दोन्ही प्रभागांत प्रचारामध्ये नावापुरती दिसत आहे. दोन्ही प्रभागांत त्या-त्या पक्षाचे व इतर मित्रपक्षांचे हातावर मोजण्याइतकेच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात दिसत आहे. चारही पक्षांकडे काही जणांची नावाला उपस्थिती असून, आगामी राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून हातचे राखून असल्यासारखा सहभाग दिसत आहे. प्रतिस्पर्धी पक्ष, पदाधिकारी यांच्याशी असलेल्या संबंधामुळे काहीजणांना स्वपक्षाकडून ‘ठराविक’ कामात सहभागी करून घेतले जात असल्याचे चित्र दिसत आहे. पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह जाणवत नसला तरी उमेदवारांच्या प्रचाराच्या गाड्या गल्लोगल्ली एकामागून एक फिरत आहे. अद्यापपर्यंत कुठलेही चित्र स्पष्ट नसले तरी जातपात, नातेगोते यांची प्रचारात मदत घेतली जाऊ लागली आहे.
आघाडी व मनसेने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचार चालविला आहे. मात्र शिवसेना, भाजपाने शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रसद घेतल्याचे दिसत आहे. शिवसेना, भाजपामधील दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी व जिव्हारी लागणाऱ्या वागण्यामुळे दोन्ही पक्षांची सध्या एकमेकांतच लागल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)