भुकेल्या भटक्या प्राण्यांना ‘ते’ खाऊ घालतात
By अझहर शेख | Published: April 24, 2020 11:04 PM2020-04-24T23:04:48+5:302020-04-24T23:43:04+5:30
नाशिक : कोरोना आजाराने सध्या राज्याला मोठ्या प्रमाणात वेढा घातला असून, या आजारावर मात करण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे आठवडे बाजारपासून हॉटेल, ढाबे सर्व काही बंद आहेत तसेच नागरिकदेखील रस्त्यावर फारसे फिरकत नसल्याने भटक्या प्राण्यांची उपासमार होत आहे.
अझहर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना आजाराने सध्या राज्याला मोठ्या प्रमाणात वेढा घातला असून, या आजारावर मात करण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे आठवडे बाजारपासून हॉटेल, ढाबे सर्व काही बंद आहेत तसेच नागरिकदेखील रस्त्यावर फारसे फिरकत नसल्याने भटक्या प्राण्यांची उपासमार होत आहे. त्यांची उपासमार टाळण्यासाठी शहरातील प्राणिमित्रांची शरण संस्था पुढे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीने या संस्थेने भटक्या प्राण्यांना किमान एक वेळचे खाद्य पुरविण्याचा विडा उचलला आहे.
मागील काही आठवड्यांपासून राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यामुळे शहरातील सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे बंद झाले आहेत. नागरिकदेखील घराबाहेर अपवादानेच पडत असल्यामुळे भटक्या प्राण्यांची उपासमार होत आहे. तसेच शहरात काही भागांमध्ये भटक्या प्राण्यांचा मृत्यूदेखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरातील प्राणिमित्रांची भूतदया जागी झाली आणि शरण फॉर एनिमल्स या संस्थेने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आणि लॉकडाउन काळात भुकेलेल्या मुक्या जिवांची भूक भागविण्यासाठी परवानगी मागितली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश जाणून घेतला आणि शासकीय नियमावलीच्या अधीन राहून मुक्या प्राण्यांना एक वेळ भोजन पोहोचविण्यासाठी त्यांनी स्वयंसेवकांना हिरवा कंदील दाखवला.
संस्थेचे पासधारक मुख्य १२ ते १५ स्वयंसेवक सध्या शहरातील विविध भागात आपल्या मदतनीसांना सोबत घेऊन शासकीय नियमावलीच्या अधीन राहून आरोग्याच्या दृष्टीने स्वत:ची तसेच प्राण्यांचीदेखील काळजी घेण्यास प्राधान्य देत मुक्या जिवांची भूक भागविण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आपापल्या परिसरात राहून भटक्या श्वानांना तसेच अन्य मुक्या प्राण्यांना सकाळी एक ते दीड तासात फिरून खाद्य द्यायचे, असा या स्वयंसेवकांचा दिनक्रम ठरलेला आहे. विशेष म्हणजे स्वयंसेवकांमध्ये तरुणींचा सहभाग लक्षवेधी आहे.
समाजातील प्राणिप्रेमींनी सढळ हाताने जसे शक्य होईल तसे मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
------
दिवसभरात ४०० प्राण्यांना दिले जाते अन्न
शरण संस्थेची प्राण्यांकरिता असलेली रुग्णवाहिका त्यांच्या स्वयंसेवकांपर्यंत तांदूळ, डॉगफूड, चिरलेल्या पालेभाज्यांमधील टाकाऊ भाग, दूध, पाव आदी खाद्य पोहचविते. त्यानुसार स्वयंसेवक आपापल्या भागातील भटक्या प्राण्यांची भूक शमविण्यासाठी प्रयत्न करतात. दिवसाकाठी चारशे प्राण्यांपर्यंत संस्था पोहोचत असल्याचे शरण्या शेट्टी यांनी सांगितले. सर्व स्वयंसेवक लॉकडाउन काळात हातमोजे, मास्क वगैरे लावूनच भटक्या प्राण्यांना जेवण पुरवित आहेत. जेवण वाया जाणार नाही, याची खबरदारी त्यांच्याकडून घेतली जात आहे. उपासमार होऊन भटक्या प्राण्यांना आजार जडू नये याकरिता संस्थेने हे पाऊल उचलले, असे शेट्टी म्हणाल्या.