बंद कोविड केअर सेंटर्समध्ये घाणीचे साम्राज्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:08+5:302021-08-12T04:18:08+5:30
नाशिक : कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर्सची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, रुग्णांमध्ये ...
नाशिक : कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर्सची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर जून महिन्यापासून बहुतांश कोविड सेंटर्स बंद पडलेली आहेत. काही कोविड सेंटर्समध्ये कचरा, धूळ, काहींमध्ये गाद्या, बेडशीटसह अन्य टाकाऊ साहित्याचे ढीग तसेच पडून आहेत.
जिल्ह्यातील १३ कोविड केअर सेंटर्स वगळता अन्य सर्व सेंटर्स सध्या बंद पडलेली आहेत. मात्र, कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने ही बंद असलेली कोविड सेंटर्सदेखील सज्ज ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, यंत्रणादेखील बऱ्याचअंशी निद्रिस्त झाली आहे.
इन्फो
कुठे पडला कचरा, कुठे चादरींचा ढीग
समाज कल्याण कोविड सेंटर
समाज कल्याणचे कोविड केअर सेंटर बंद असून केंद्रात आतील भागात धूळ तसेच जीर्ण चादरींचा ढीग अद्यापही कायम आहे. त्याशिवाय बाथरूम, टॉयलेटच्या तुटक्या बादल्या आणि अन्य सामानही पडून आहे.
मेरी कोविड सेंटर
मेरीेचे कोविड सेंटरदेखील सध्या बंद असून, आतील भागात कचरा, बिनकामाच्या टाकाऊ वस्तूंचे ढीग पडून आहेत. सेंटरच्या बाहेरदेखील धुळीचे साम्राज्य असून, सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.
या बंद सेंटर्सना वाली कोण?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आले होते. त्यात शासकीय सेंटर्सबरोबरच काही सामाजिक, व्यावसायिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनीदेखील कोविड सेंटरची निर्मिती केली होती. मात्र, सध्या त्यातील बहुतांश सेंटर्स बंद अवस्थेत असून त्यांना कुणीही वाली नाही, असेच चित्र दिसून येत आहे.
यदाकदाचित जर तिसरी लाट अचानकपणे वाढली तर त्या कोविड सेंटर्सना पुन्हा सज्ज होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच ही कोविड सेंटर्स सज्ज ठेवण्याची तयारी करणे आवश्यक आहे.
-----------------------
०९पीएचजेमयु ९४ ( नीलेश तांबे यांनी काढलेला फोटो - बेड पडलेले ) हा वापरावा.