बसस्थानकामध्ये खड्ड्यांसह घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:30+5:302021-06-30T04:10:30+5:30
नांदूरशिंगोटे : जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठला नसला तरी एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्यापही ग्रामीण भागातील काही ठिकाणी बसेस ...
नांदूरशिंगोटे : जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठला नसला तरी एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्यापही ग्रामीण भागातील काही ठिकाणी बसेस जात नाहीत. मात्र, येथील बसस्थानकात विविध जिल्ह्यांतून बसेस येतात. रोडावलेली प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे. परंतु बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर परिसरात कचऱ्याच्या कुंड्या भरलेल्या असल्याने तेथे दुर्गंधीयुक्त कचरा पसरला आहे.
कोरोना महामारीनंतर काही सुविधांना परवानगी देण्यात आली. यामध्ये ५० टक्के क्षमतेच्या अटीवर बसेस सुरू झाल्या आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तसेच सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांच्या मध्यवर्ती नांदूरशिंगोटे येथील बसस्थानक आहेत. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये येथे असल्याने प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. येथील बसस्थानकात अहमदनगर, पुणे, बीड, सोलापूर, नाशिक, धुळे, सांगली, सातारा आदींसह सिन्नर व संगमनेर आगारांच्या बसेस येत असतात. दररोज शंभरहून अधिक बसची नोंद येथे होत असते. बहुतांश ठिकाणी बसेस धावू लागल्या आहेत. बसेसच्या मानाने अद्यापही प्रवाशांची संख्या कमी आहे. परंतु बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक आवारात फलाटासमोर झाडेझुडुपे वाढली आहेत. पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे.
------------------
प्रशासनाने दक्षता घ्यावी
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास दुचाकीस्वारांनाही होतो. आवारातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. कचऱ्याच्या कुंड्या निकामी झाल्याने कुंड्यांभोवतीच कचरा साचून राहिला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने बसस्थानकाच्या आवारात असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात ठिकठिकाणी पडलेले खड्डे. (२९ नांदुरशिंगोटे १)
===Photopath===
290621\29nsk_6_29062021_13.jpg
===Caption===
२९ नांदूरशिंगोटे १