नववर्ष गुढीपाडवा स्वागतानिमित्त मुक्तिधाममध्ये महारांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:36 AM2018-03-17T00:36:39+5:302018-03-17T00:36:39+5:30
नववर्ष गुढीपाडवा स्वागतानिमित्त मुक्तिधाममध्ये ४० बाय ७० फूट आकाराची विविध संदेश देणारी महारांगोळी काढण्यात आली आहे.
नाशिकरोड : नववर्ष गुढीपाडवा स्वागतानिमित्त मुक्तिधाममध्ये ४० बाय ७० फूट आकाराची विविध संदेश देणारी महारांगोळी काढण्यात आली आहे. मराठी नववर्ष स्वागतानिमित्त मुक्तिधामच्या अग्रभागी प्रांगणात नाशिकरोड विभागाच्या ६० महिला व युवतींनी ४० बाय ७० फूट आकाराची महारांगोळी काढण्यास सुरुवात केली. दुपारी २ वाजता महारांगोळी काढण्याचे काम पूर्ण झाले. याकरिता एकूण एक हजार किलो रांगोळी व रंगांचा वापर करण्यात आला. महारांगोळीमधून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, राष्टÑसेवा, पाणी वाचवा, झाडे लावा, प्राणी दया, अपंग व्यक्तींना मदत करा, स्त्री-पुरुष समानता, दानधर्म करा, शुभंकरोती मुलांना शिकवा असे विविध संदेश देण्यात आले आहेत. मुक्तिधाममध्ये बाहेरगावहून देवदर्शनासाठी आलेले भाविक व स्थानिक नागरिक, महिला महारांगोळी बघण्यासाठी गर्दी करीत आहेत. गुढीपाडव्यापर्यंत महारांगोळी तशीच ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समिती नाशिकरोड-जेलरोड विभागाने केले आहे.