प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:30 AM2018-05-19T01:30:39+5:302018-05-19T01:30:39+5:30
नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़ पांडे यांनी शुक्रवारी (दि़ १८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़ पांडे यांनी शुक्रवारी (दि़ १८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ बाळू विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे व गजानन कुराडे अशी या आरोपींची नावे आहेत़ विंचूर गवळी शिवारात २७ फेब्रुवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती़
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत विंचूर गवळी शिवारात नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी बाळू खिल्लारे, प्रदीप खिल्लारे व गजानन कुराडे यांनी मयत राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा़ हाताळे, ता़ शेनगाव, जि़ हिंगोली) यास लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते़ उपचारादरम्यान हिंगोले याचा मृत्यू झाल्याने आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ आडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आऱ पिंपरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुरावे गोळा केले होते़ न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजयकुमार पाटील व वाय़डी़ कापसे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़ साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश पांडे यांनी शिक्षा सुनावली़ या खटल्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक आऱ एस़ जोशी व पोलीस हवालदार एम़ के़ माळोदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़