पोलिसांनी उधळले कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:42 AM2018-05-15T01:42:50+5:302018-05-15T01:42:50+5:30
गेल्या चौदा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर सरकारवाडा पोलिसांनी उधळवून लावत उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
नाशिक : गेल्या चौदा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर सरकारवाडा पोलिसांनी उधळवून लावत उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उपोषण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर करीत रात्री आठ वाजेच्या सुमारास आंदोलन उधळवून लावले. विशेष म्हणजे सीटूचे कोणतेही नेते उपस्थित नसताना पोलिसांनी उपोेषणकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन मोडण्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी संतप्त उपोषणकर्त्यांनी केला. आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर गेल्या पाच महिन्यांपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मेपासून विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाºयांनी उपोषण सुरू केले होते. सदर आंदोलन मोडून काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी या कामी यश न आलेल्या पोलिसांनी अखेर सोमवारी उपोषणकर्त्यांचा मंडप काढून टाकला. गेल्या पंधरा दिवसांपासून लोकशाही मार्गाने उपोषण सुरू असताना आणि वाहतुकीस कोणताही अडथळा नसतानाही पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर चुकीचा असल्याचा आरोप सर्व कर्मचाºयांनी केला आहे. लोकशाही मार्गाने उपोषण सुरू असतानाही पोलिसांनी कोणतेही ठोस कारण न देता उपोेषण मोडून काढले. कर्मचाºयांनी पोलिसांना याप्रकरणी जाबही विचारला मात्र कोणताही कागद न दाखविता पोलिसांच्या ताफ्याने मंडप खाली उतरविला. वास्तविक रविवारीच पोलीस आयुक्त आणि सीटूच्या नेत्यांमध्ये कर्मचाºयांच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्त सिंगल यांनी कर्मचाºयांची बाजू समाधानकारक असल्याचे सांगून याप्रकरणी मध्यस्थी करण्याचीदेखील तयारी दर्शविली होती. मात्र सोमवारी अचानक पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याचीच कारवाई केली.