बडतर्फीच्या भीतीपोटी इगतपुरी आगाराचे कर्मचारी कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 12:10 AM2021-11-11T00:10:57+5:302021-11-11T00:11:55+5:30
इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे.
इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. दरम्यान, आगारातील काही कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने बडतर्फीच्या नोटिसा बजावल्याने व खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. कर्मचारी मात्र दहशत व भीतीपोटी यावर काहीही बोलायला तयार नाहीत.
राज्यभरात एसटी महामंडळाच्या बव्हंशी कर्मचाऱ्यांनी एस. टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी
संप पुकारला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील महामंडळाचे आगार ग्रामीण भागातील प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी दिवाळीच्या काळात येथील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. या संपात जवळपास २८५ कर्मचारी सहभागी झाले होते.
मात्र यांतील काही कर्मचाऱ्यांना एस. टी. प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याच्या भीतीने तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीने सदर संप मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. इगतपुरी तालुक्यातील बससेवा ही वाडीवऱ्हे, टाकेद ते कसाऱ्यापर्यंत चालू असून ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवरही प्रवाशांचीही ने-आण सुरू आहे. एस. टी. बस बाहेरगावी जात नसल्याने
इगतपुरी एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
इगतपुरी एस. टी. महामंडळाच्या आगारामध्ये कुठल्याही प्रकारे संघटनांनी व कर्मचाऱ्यांकडून आम्हाला बंदबाबत निवेदन प्राप्त झाले नाही. मात्र ग्रामीण भागात एस.टी.ची सेवा सुरू आहे.
- संदीप पाटील, आगारप्रमुख, इगतपुरी
कर्मचाऱ्यांनी संप पुकारला त्यावेळी जवळपास पाच दिवस आगाराचे कामकाज बंद होते. त्यात फक्त इगतपुरी व कळवण यांनीच आंदोलनाला सुरुवात केली होती. आमच्या दहा कमचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र भीतीपोटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
- पीडित कर्मचारी